Friday, 9 September 2011

संधिप्रकाश – TWILIGHT


 संधिप्रकाश
आयुष्याची आता झाली उजवण
येतो तो तो क्षण अमृताचा

जे जे भेटे ते ते , दर्पणीचे बिंब
तुझे प्रतिबिंब , लाडेगोडे

सुखोत्सवे असा , जीव अनावर
पिंजऱ्याचे दार, उघडावे

संधीप्रकाशात, अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी

असावीस पास, जसा स्वप्नभास
जीवी कासावीस , झाल्याविना

तेव्हा सखे आण, तुळशीचे पान
तुझ्या घरी वाण नाही त्याची

तूच ओढलेले , त्यासवे दे पाणी
थोर ना त्याहुनी तीर्थ दुजे

वाळल्या ओठा दे, निरोपाचे फूल
भूलीतली भूल, शेवटली

संधीप्रकाशात , अजून जो सोने
तो माझी लोचने , मिटो यावी
        
                       - बा. भ. बोरकर

काही क्षण ,किंवा काही दिवस आपल्या मनावर असे कोरले जातात की एखाद्या आवडत्या सिनेमासारखे  कितीही वेळा रिवाइंड केले तरी तोच अनुभव देऊन जातात. त्या क्षणांचे सगळे डीटेल्स,  रंग, रूप, गंध, ध्वनी इत्यादी सगळ्या अनुभूतींसकट आपल्या मनाच्या हार्ड डिस्कवर कायमचे रेकॉर्ड होऊन जातात. उदाहरणच द्यायचं झालं तर .... सायकल शिकता शिकता पहिल्यांदा जमून गेलेला तोल , शोले पहिल्यांदा पाहिलेला दिवस, पहिली भेट, पहिला स्पर्श,  पितृत्वाचा / मातृत्वाचा पहिला अनुभव, बर्फाने झाकून गेलेल्या शिखराचं  पहिलं  दर्शन , पहिल्यांदा ऐकलेली मेहदी हसनची गजल इ.इ.

असाच काहीसा अनुभव आला होता जेव्हा बोरकरांची " संधिप्रकाश " ही कविता पहिल्यांदा सलील कुलकर्णीच्या आवाजात ऐकली होती . बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या इन्कमटॅक्स ऑफिसमधून बाहेर पडलो आणि रिक्षात बसलो . कानाला इयरफोन लावलेला होता आणि सलील सुरु झाला. काहीतरी उदास, तरीही उत्सवाचा आभास देणारं, काहीतरी घट्ट बांधून ठेवणारं, तरीही चिरंतन मुक्तीची झलक दाखवणारं असं कानावर पडत होतं आणि हृदयात उतरत होतं . पुन्हा पुन्हा ऐकत, भारलेल्या अवस्थेत घरी कधी पोचलो कळलंच नव्हतं. बोरकरांचे शब्द, सलीलची चाल आणि त्याचाच आवाज हे कॉम्बिनेशन असं काही अंगावर आलं होतं की पुढचे काही दिवस जो भेटेल त्याला ते ऐकवत होतो.  "अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी ,लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती" हे गाणं आणि "एकवार पंखावरूनी फिरो तुझा हात , शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात" हे दुसरं गाणं आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांनीच ऐकलं असेल आणि चटका बसलेले माझ्यासारखे अनेकजण ही गाणी ऐकून अंतर्मुखही झाले असतील. पण " संधिप्रकाश " म्हणजे या दोन्ही गाण्यांच्या आशयाची  अत्यंत हळवी पण तितकिच  स्पष्ट निरवानिरव आहे .  मरावं तर असं , असं वाटायला लावणाऱ्या काही गाण्यांपैकी माझी आवडती दोन आहेत . एक म्हणजे रफीचं " कर चले  हम फिदा जानोतन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो" आणि दुसरं संधिप्रकाश .

संधिप्रकाश ऐकणार ? ऐकाच . 
एखाद्या अतीव उत्कट क्षणाचा अनुभव आपल्यासारखाच सगळ्यांच्या वाट्याला यावा , किंवा कमीत कमी आपला आनंद जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करता यावा असं मला नेहेमीच वाटत आलय. अर्थातच स्वार्थापोटी आलेला हा विचार आहे कारण जितक्या लोकांबरोबर शेअर करू तितक्या पटीत आपला आनंद वाढतो हे जगजाहीर आहे. याच विचारातून बोरकरांच्या या कवितेचा इंग्रजीत अनुवाद करण्याची इच्छा निर्माण झाली. किट्स आणि शेलेची पोएट्री  , गालिब आणि मजाजची शायरी यांच्या तोडीस तोड साहित्य माझ्या मायमराठीतही आहे. त्याचा मझा अमराठी रसिकांनाही मिळावा हाच  या मागचा हेतू. बोरकरांच्या मूळ कवितेशी या भाषांतराची तुलना म्हणजे चित्रातला आंबा चाटून त्याच्या चवीचा अंदाज बांधण्यासारखं आहे याची मला चांगली कल्पना आहे पण निदान  " खंडहर देखनेसे पता तो चलेगा के ईमारत कितनी बुलंद, कितनी खूबसूरत हुवा करती थी"  


TWILIGHT
 Life has almost come a full circle.
Blessed bliss is every moment hereafter.

 Everything , now, is a reflection of myself.
And thus, of you too, for how can I tell myself apart from you ?

 The soul, so drunk on happiness, now seeks to flee.
Its time, to throw the doors wide open.

 Let me go into that kind , silent night.
With the last memory of the golden twilight.

 Be by my side, as beautifully real as a dream.
But without the agony of a broken dream.

 A final plea to your altar , to bless my final hour.
You too will surely put in a prayer or two, won’t you ?
 
 Just a drop of water please, from the pail freshly pulled by you.
For its nothing less than nectar, or the holy water too.

 Perhaps one last kiss on the parched lips .
Before this magical spell ends, my feeble hold slips .

Let me go into that kind , silent night.
With the last memory of the golden twilight.                            ====== x ======

4 comments:

 1. सुंदर कविता, अपूर्व सादरीकरण.
  अनुवाद उत्तम झाला आहे. खूप आवडला.
  A final plea to your altar , to bless my final hour.
  You too will surely put in a prayer or two, won’t you ?

  हे तर अतिशय उत्कट!

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद क्रांती ! तुझ्याकडून पसंतीमुद्रा आली म्हणजे माझा प्रयत्न सत्कारणी लागला असं समजायला हरकत नाही .

   Delete
 2. अरविंद दादा काय सुरेख कविता, सुरेख गाणे, आणि सुरेख अनुवाद. अप्रतिम मेळ आहे हा सगळा.

  ReplyDelete
  Replies
  1. बास का राव ? लिहायचं मी आणि कौतुक कुठल्या तरी अरविंद दादाचं ? भल्याची दुनिया नाही हल्ली ! असो ! नावात चुकून गलतीसे मिष्टेक झालीय हे लक्षात आलंय माझ्या . हौसला अफ्जाई का शुक्रिया !

   Delete