Friday, 4 May 2018

दप्तराला द्या कायमची सुट्टी !

इतर देशांच्या आर्थिक सुबत्तेचा हेवा वाटतो ?


तिथल्या प्रदूषणविरहित वातावरणाविषयी असूया वाटते ?

तिथे जाऊन आल्यावर तिथल्या स्वच्छतेविषयी बोलण्यात तुमचे काही महिने जातात ?

तिथले नागरिक कसे प्रामाणिक, कसे शिस्तप्रिय आहेत हा विषय तोंडी लावायला किती छान असतो नाही ? पण तोंडी लावायचे पदार्थ पोटभरीचे नसतात हे जाणवायला लागतं आणि पुन्हा आपण आलीया भोगासी म्हणत आपल्या तुटपुंज्या शिदोरीसह चाकोरीतली वाट तुडवायला लागतो.

आज जागतिक महासत्ता बनायची स्वप्नं बघणारा देश अजूनही अर्धशिक्षित आहे, वैचारिकदृष्ट्या मागासलेला आहे, दारिद्र्यरेषेखाली आहे, आणि बरंच काही आहे. मला बरंवाईट कळायला लागल्यापासून ते आजपर्यंत या परिस्थितीत काहीच फरक पडलेला नाही. तो पडणारही नव्हताच कारण मुळातच कीड होती आणि आहे. कशी, ते सांगतो .

आज, उद्या, परवा, तेरवा, फार फार तर पुढला महिना, वर्ष...बस्स ! इतकीच धाव असते आपल्या दूरदृष्टीची. मग तो सामान्य माणूस असो, की सरकार. आपलं आयुष्य, किंवा आपली सत्तेची मुदत इतकीच मजल. आपल्या हयातीत फळं देणारी झाडं लावण्यातच इतिकर्तव्यता असेल तर फार मोठी स्वप्नं पाहू नयेत माणसाने. यंत्रयुग येऊन जुनं झालं. तंत्रयुगसुद्धा सरावाचं झालं, पण बियाणंच कमअस्सल असेल तर कुठलंच यंत्र, तंत्र वा मंत्र तुम्हाला कसदार पीक देऊ शकणार नाही. आणि माझ्या मते हेच आपल्यासमोर असलेल्या बहुतेक सगळ्या समस्यांचं मूळ आहे. देश घडवतात ते देशाचे नागरिक, आणि चांगले नागरिक घडवण्यात आपला देश इतर देश प्रगत देशांपेक्षा कित्येक वर्षं मागे आहे. आणि याचं एकमेव कारण आहे आपली पंचवीस वर्षांपूर्वीच कालबाह्य झालेली शिक्षणव्यवस्था. पंचवीस वर्षं अशासाठी म्हणतोय की संगणकयुग आपल्या देशात रुजून तितकी वर्षं नक्कीच झालीत. तीच वेळ होती आपली जुनाट, आणि जवळजवळ निरुपयोगी झालेली शिक्षणपद्धती बदलायची. काळाची पावलं ओळखून शिक्षणव्यवस्था, अभ्यासक्रम आखले गेले असते तर आज देश कुठल्या कुठे असता.

तीन भाषा, इतिहास,भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान, गणित, भूमिती....पिढ्यानपिढ्या तेच ते आणि तेच ते. शिवाय सब घोडे बारा टक्के न्यायाने सरसकट या विषयांची धोपटी विद्यार्थ्यांनी डोक्यावर बाळगायची, घोटवून पाठ केलेली उत्तरं लिहायची आणि पुढल्या यत्तेत जायचं हे रहाटगाडगं आणखी किती वर्षं सुरु राहणार आहे ? आज शिक्षणाचा दर्जा इतका घसरला आहे की बारावी पास असलेल्या मुलांना स्वतःचा नावपत्तासुद्धा बिनचूक लिहिता येत नाही, आणि उच्च पदवीधर शिक्षकही ठर्रा पिऊन आणि खर्रा खाऊन पचापच थुंकताना दिसतात ही मी पाहिलेली वस्तुस्थिती आहे. “आता पाहिल्यासारखे शिक्षक राहिले नाहीत” हे उत्तर माझ्या तोंडावर फेकू नका, कारण याच दरिद्री शिक्षणव्यवस्थेतून तेही आलेले आहेत.

मला सांगा, काय करायचा आहे साठ मार्कांचा इतिहास, तीस मार्कांचा भूगोल आणि दहा मार्कांचं नागरिकशास्त्र ? देशाच्या आणि राज्याच्या इतिहासाची ओळख करून द्या मुलांना, मग त्यांचं त्यांना ठरवू द्या की इतिहासात त्यांना रस आहे की नाही. शर्टाच्या खिशात अख्खं जग सामावतं हल्ली. काय करायचा आहे भूगोल ? रोजच्या व्यवहारापुरती आकडेमोड शिकवा मुलांना, आणि मग त्यांचं त्यांना ठरवू द्या गणितात आणखी काय शक्यता आहेत ते. दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडेल इतकंच बेसिक विज्ञान बांधून द्या त्यांना, मग त्यात पदवीधर व्हायचं की आणखी मोठी क्षितिजं धुंडाळायची ते त्यांचं ते ठरवतील. आयुष्यभर चित्रं काढायची आहेत ? संगीत शिकायचं आहे ? खेळायचं आहे ? लिहायचं आहे? हे त्यांचं त्यांना ठरवता येईल इतका विचार करण्याइतकं शिक्षण त्यांना द्या. खरं सांगायचं तर नागरिकशास्त्र हा विषय सगळ्यात महत्वाचा आहे. तो शंभर मार्कांचा करा आणि पोटार्थी कारकून घडवण्याऐवजी सुजाण नागरिक घडवा. त्यांना आवडणाऱ्या विषयासाठी राबतानासुद्धा त्यांच्या ओठांवर गाणं असेल, चेहेऱ्यावर हसू असेल. शिस्त, संयम, धीर, समतोल, शौर्य, हे सगळे गुण अत्यंत सहजतेने अंगावर वागवेल ती पिढी.

पोटार्थी कारकुनांच्या पिढ्या घडवणं ही ब्रिटीश राजवटीची गरज होती, आणि त्याच पद्धतीची शिक्षणव्यवस्था त्यांनी तयार केली. त्यांच्या मायभूमीत मात्र त्यांनी जमिनीची मशागत करण्यापासून ते बीज संपूर्ण निर्दोष ठेवण्यापर्यंत त्यांची बुद्धी राबवली. त्यांचा हेतू ते साध्य करून निघून गेले, पण येणारी सरकारं तरी किती वेगळी होती ? त्यांनाही रस होता तो फक्त त्यांचे मतदारसंघ तयार करण्यातच. या बेदिलीमुळे नुकसान झालंय ते माझं आणि तुमचं. आपल्या गेलेल्या कित्येक पिढ्यांचं, आणि जर ही शिक्षणव्यवस्था आमुलाग्र बदलली नाही तर येणाऱ्या कित्येक पिढ्यांचंही.  कापणीसाठीही थोडी वाट पहावी लागेल, पण नव्या शिक्षणपद्धतीतून किमान पाच पिढ्या निघाल्याखेरीज बीज निर्दोष होणार नाही.

हे आज, आत्ता, ताबडतोब व्हायला हवंय !!!  खूप उशीर झालाय आधीच.